| 18.10.2024 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हाला गुल-गुल (फूल) बनविण्यासाठी, तुम्ही फुलासारखी मुले कधीच कोणाला दुःख देऊ शकत नाही, सदैव सुखच देत रहा” | |
| प्रश्न:- | कोणत्या एका गोष्टीमध्ये तुम्हा मुलांना खूप काळजी घ्यायची आहे? |
| उत्तर:- | मनसा-वाचा-कर्मणामध्ये आपल्या वाणीची खूप काळजी घ्यायची आहे. बुद्धीने विकारी दुनियेची सर्व लोकलाज आणि कुळाच्या मर्यादा विसरायच्या आहेत. स्वतःला तपासायचे आहे की, मी किती दिव्यगुण धारण केले आहेत? लक्ष्मी-नारायणासारखा सुसंस्कृत बनलो आहे का? गुल-गुल (फूल) कितपत बनलो आहे? |
ओम् शांती. शिवबाबा जाणतात, हे आत्मे माझी मुले आहेत. तुम्हा मुलांनी स्वतःला आत्मा समजून शरीराला विसरून शिवबाबांची आठवण करायची आहे. शिवबाबा म्हणतात - मी तुम्हा मुलांना शिकवतो. शिवबाबा सुद्धा निराकार आहेत, तुम्ही आत्मे सुद्धा निराकार आहात. इथे येऊन पार्ट बजावता. बाबा देखील येऊन पार्ट बजावतात. तुम्ही हे देखील जाणता ड्रामा प्लॅन अनुसार बाबा येऊन आम्हाला गुल-गुल (फूल) बनवतात. तर सर्व अवगुणांना सोडून गुणवान बनले पाहिजे. गुणी मुले कधी कोणाला दुःख देत नाहीत. ऐकून न ऐकल्यासारखे करत नाहीत. कोणी दुःखी असेल तर त्याचे दुःख दूर करतात. बाबा देखील आले आहेत तर दुनियेतील सारी दुःखे नक्कीच दूर होणार आहेत. बाबा तर श्रीमत देतात, जितका शक्य आहे तितका पुरुषार्थ करून सर्वांचे दुःख दूर करत रहा. पुरुषार्थानेच चांगले पद मिळेल. पुरुषार्थ केला नाही तर पद कमी होईल. ते मग कल्प-कल्पांतराचे नुकसान होते. बाबा मुलांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात. मुलांनी आपले नुकसान करून घ्यावे - असे बाबांना वाटत नाही. दुनियावाले फायदा आणि तोट्याला जाणत नाहीत त्यामुळे मुलांनी स्वतःवर दया करायची आहे. श्रीमतावर चालत रहायचे आहे. भले बुद्धी इकडे-तिकडे धावते तरीदेखील प्रयत्न करा आम्ही अशा बेहदच्या बाबांची आठवण का करत नाही, ज्या आठवणीद्वारेच उच्च पद मिळते. कमीत-कमी स्वर्गात तर जातात. परंतु स्वर्गामध्ये उच्च पद घ्यायचे आहे. मुलांचे आई-वडील म्हणतात ना - ‘आमच्या मुलाने शाळेत चांगले शिकून खूप उच्च पद मिळवावे’. इथेतर कोणालाच कळून येत नाही. तुमचे नातेवाईक हे जाणत नाहीत की तुम्ही काय शिकत आहात. त्या लौकिक शिक्षणाच्या बाबतीत तर मित्र-नातेवाईक सर्व जाणतात, इथे मात्र कोणी जाणतात, तर कोणी जाणत नाहीत. कोणाच्या वडिलांना समजते परंतु भावंडाना कळत नाही. कोणाच्या आईला समजते परंतु वडिलांना कळत नसते कारण हे शिक्षणही विचित्र आणि शिकविणारा सुद्धा विचित्र आहे. नंबरवार समजतात, बाबा म्हणतात, भक्ती तर तुम्ही खूप केली आहे. ती देखील नंबरवार, ज्यांनी पुष्कळ भक्ती केली आहे तेच मग हे ज्ञान सुद्धा घेतात. आता भक्तीच्या चालीरीती पूर्ण होतात. आधी मीरासाठी म्हटले जात होते - तिने लोकलाज कुळाची मर्यादा सोडली. इथे तर तुम्हाला संपूर्ण विकारी कुळाची मर्यादा सोडायची आहे. बुद्धीने सर्व गोष्टींचा संन्यास करायचा आहे. या विकारी दुनियेतील काहीच चांगले वाटत नाही. विकर्म करणारे अजिबात चांगले वाटत नाहीत. ते आपल्याच नशिबाला खराब करतात. असा कोणी पिता थोडाच असेल ज्याला आपल्या मुलांनी कोणालातरी त्रास दिलेले आवडत असेल किंवा न शिकणारा मुलगा आवडत असेल. तुम्ही मुले जाणता, तिथे (सतयुगामध्ये) अशी मुले नसतात. नावच आहे - देवी-देवता. किती पवित्र नाव आहे. आपले स्वतःचे निरीक्षण करायचे आहे - माझ्यामध्ये दैवीगुण आहेत का? सहनशील सुद्धा बनावे लागते. बुद्धी-योगाची गोष्ट आहे. ही लढाई तर खूप चांगली आहे. बाबांची आठवण करण्यामध्ये कोणत्याही युद्धाची गोष्ट नाही. बाकी हो, यामध्ये माया विघ्न टाकते. तिच्यापासून सांभाळून रहायचे असते. मायेवर विजय तर तुम्हालाच प्राप्त करायचा आहे. तुम्ही जाणता कल्प-कल्प आम्ही जे काही करत आलो आहोत, अगदी अचूक तसाच पुरुषार्थ चालतो जो कल्प-कल्प चालत आला आहे. तुम्ही जाणता आता आम्ही पद्मा-पदम भाग्यशाली बनतो आणि मग सतयुगामध्ये अथाह सुखामध्ये असतो.
कल्प-कल्प बाबा असेच समजावून सांगतात. ही काही नवीन गोष्ट नाही, खूप जुनी गोष्ट आहे. बाबांची तर इच्छा आहे मुलांनी पूर्ण फूल बनावे. लौकिक पित्याची देखील इच्छा असते ना - आपल्या मुलांनी फूल बनावे. पारलौकिक बाबा तर येतातच काट्यांना फूल बनविण्यासाठी तर मग तसे बनले पाहिजे ना. मनसा-वाचा-कर्मणा वाणीची देखील खूप काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक कर्मेंद्रियांवर अतिशय बारीक लक्ष पाहिजे. माया खूप धोका देणारी आहे. तिच्यापासून खूप सावधगिरी बाळगायची आहे, कारण ध्येय मोठे आहे. अर्ध्या कल्पापासून क्रिमिनल (विकारी) दृष्टी बनली आहे. तिला एका जन्मामध्येच सिव्हिल (निर्विकारी) बनवायची आहे; जशी या लक्ष्मी-नारायणाची आहे. हे सर्वगुण संपन्न आहेत ना. तिथे (सतयुगामध्ये) क्रिमिनल दृष्टी नसते. रावणच नाही. ही काही नवीन गोष्ट नाही. तुम्ही अनेकदा हे पद प्राप्त केले आहे. दुनियेला तर अजिबात माहिती सुद्धा नाही. की हे काय शिकत आहेत. बाबा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात. अशुभ इच्छा तर रावणाच्या असतात. तुमच्या आहेत शुभ इच्छा. कुठलीही विकारी इच्छा असता कामा नये. मुलांनी सुखाच्या लाटांवर तरंगत रहायचे आहे. तुमच्या अथाह सुखाचे वर्णन करू शकत नाही, दुःखाचे वर्णन केले जाते, सुखाचे वर्णन थोडेच केले जाते. तुम्हा सर्व मुलांची एकच आशा आहे की आपण पावन बनावे. कसे पावन बनणार? ते तर तुम्ही जाणता की पावन बनविणारे एक बाबाच आहेत, त्यांच्या आठवणीनेच पावन बनणार. नवीन दुनियेमध्ये पहिल्या नंबरवर या पावन देवी-देवताच आहेत. पवित्रतेमध्ये पहा किती ताकद आहे. तुम्ही पावन बनून पावन दुनियेचे राज्य प्राप्त करता म्हणून म्हटले जाते - या देवता धर्मामध्ये खूप ताकद आहे. ही ताकद कुठून मिळते? सर्वशक्तिमान बाबांकडून. घरामध्ये मुख्य दोन-चार चित्रे ठेवून तुम्ही खूप सेवा करू शकता. ती वेळ सुद्धा येईल, कर्फ्यु इत्यादी असे लागतील ज्यामुळे तुम्ही कुठेही जा-ये करू शकणार नाही.
तुम्ही आहात ब्राह्मण, सच्ची गीता ऐकविणारे. ज्ञान तर अगदी सोपे आहे, ज्यांच्या घरातील सर्व सदस्य येतात, तिथे तर शांतीचे साम्राज्य पसरलेले असते, त्यांच्यासाठी तर खूपच सोपे आहे. दोन-चार मुख्य चित्रे घरामध्ये लावलेली असावीत. हे त्रिमूर्ती, गोळा, झाड आणि शिडी एवढी चित्रे पुरेशी आहेत. त्यासोबतच ‘गीतेचा भगवान श्रीकृष्ण नाही’, हे देखील चित्र खूप चांगले आहे. किती सोपे आहे, यामध्ये काही पैसे खर्च होत नाहीत, चित्र तर ठेवली आहेत; चित्रांना पाहूनच ज्ञान आठवत राहील. स्वतंत्र खोली बनविलेली असावी, तिथे भले तुम्ही झोपू देखील शकता. जर श्रीमतावर चालत रहाल तर तुम्ही अनेकांचे कल्याण करू शकता. तुम्ही कल्याण करत देखील असाल तरी देखील बाबा आठवण करून देतात - तुम्ही असे-असे करू शकता. ठाकुरजीची मूर्ती ठेवतात ना. आणि यामध्ये (ज्ञानामध्ये) आहेत समजून सांगण्याच्या गोष्टी. जन्म-जन्मांतर तुम्ही भक्तिमार्गामध्ये मंदिरांमध्ये भटकत राहता परंतु हेच माहीत नाहीये की हे आहेत कोण? मंदिरांमध्ये देवींची पूजा करतात, आणि त्यांनाच नेऊन मग पाण्यामध्ये बुडवून टाकतात (विसर्जित करतात). किती अज्ञान आहे. पूज्यची, पूजा करून मग त्यांना उचलून समुद्रामध्ये बुडवून टाकतात. गणेशाला, देवीला, सरस्वतीला सुद्धा विसर्जित करतात. बाबा बसून मुलांना कल्प-कल्प या गोष्टी समजावून सांगतात. जाणीव करून देतात - की तुम्ही हे काय करत आहात! जेव्हा बाबा, मुलांना इतके समजावून सांगत राहतात की, गोड-गोड मुलांनो, हे तुम्ही काय करत आहात! तर मुलांना अशा चुकीच्या गोष्टींचा तिरस्कार वाटला पाहिजे. याला म्हणतातच विषय वैतरणी नदी. असे नाही की, तिथे (सतयुगामध्ये) कोणता दुधाचा सागर आहे, परंतु तिथे प्रत्येक गोष्ट अमाप असते. कोणत्याही गोष्टीसाठी पैसे लागत नाहीत. पैसे तर तिथे असतही नाहीत. सोन्याचेच शिक्के दिसतात कारण घरांनाच सोने लावलेले असते, विटा सोन्याच्या लावतात. तर यावरून सिद्ध होते की तिथे सोन्या-चांदीला काहीच किंमत नसते. इथे तर बघा किती किंमत आहे. तुम्ही जाणता प्रत्येक गोष्टीमध्ये एक नवल भरलेले आहे. मनुष्य तर मनुष्यच आहेत, हे देवता सुद्धा मनुष्य आहेत परंतु त्यांचे नाव ‘देवता’ आहे. त्यांच्यासमोरच मनुष्य आपली विकृती जाहीर करतात - आम्ही पापी, नीच आहोत, आमच्यामध्ये कोणतेही गुण नाहीत. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये एम ऑब्जेक्ट आहे, आम्ही हे मनुष्यापासून देवता बनतो. देवतांमध्ये दैवी गुण आहेत हे तर समजतात. मंदिरांमध्ये जातात परंतु हे समजत नाहीत की हे देखील मनुष्यच आहेत, आपण देखील मनुष्य आहोत परंतु हे दैवी गुणवाले आहेत, आम्ही आसुरी गुणवाले आहोत. आता तुमच्या बुद्धीमध्ये येते की आपण किती ना-लायक होतो. यांच्यासमोर जाऊन गात होतो - ‘आप सर्वगुण संपन्न…’. आता बाबा समजावून सांगत आहेत हे तर भूतकाळात होऊन गेले आहेत. यांच्यामध्ये दैवी गुण होते, अथाह सुखे होती. तेच आता अपार दुःखी बनले आहेत. यावेळी सर्वांमध्ये ५ विकारांची प्रवेशता आहे. आता तुम्ही विचार करता की, कसे आपण वरून खाली येता-येता एकदम धारातीर्थी पडलो आहोत. भारतवासी किती श्रीमंत होते. आता तर पहा सारखे कर्ज घेत राहतात. तर या सर्व गोष्टी बाबाच बसून मुलांना समजावून सांगतात, दुसरे कोणीही सांगू शकणार नाही. ऋषी-मुनी देखील नेती-नेती म्हणत होते म्हणजेच आम्ही जाणत नाही. आता तुम्हाला समजते आहे की ते खरे बोलत होते. ना बाबांना, ना रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत होते. आता देखील तुम्हा मुलांव्यतिरिक्त कोणीही जाणत नाहीत. मोठ-मोठे संन्यासी, महात्मा कोणीच जाणत नाहीत. वास्तविक महान आत्मा तर हे लक्ष्मी-नारायण आहेत ना. सदा पावन आहेत. हे स्वतः देखील जाणत नव्हते तर मग दुसरे कोणी कसे बरे जाणू शकणार? किती साध्या-सोप्या गोष्टी बाबा समजावून सांगतात परंतु बरीच मुले विसरून जातात. खूप जण आहेत जे चांगल्या रीतीने गुण धारण करतात तर मग गोड वाटतात. जितके मुलांमध्ये गोड गुण पाहतात तर मन आनंदाने भरून जाते. कोणी तर नाव बदनाम करून टाकतात. इथे तर मग पिता, टीचर, सद्गुरु आहेत - तिघांचीही निंदा करतात. सत् बाबा, सत् टीचर आणि सद्गुरुची निंदा केल्याने मग तिप्पट दंड पडतो. परंतु कित्येक मुलांना काहीच समजत नाही. बाबा म्हणतात, असे देखील असणार नक्की. माया देखील काही कमी नाहीये. अर्धा कल्प पाप-आत्मा बनवते. बाबा मग अर्ध्या कल्पासाठी पुण्य-आत्मा बनवतात. ते देखील नंबरवार बनतात. बनविणारे देखील दोन आहेत - राम आणि रावण. रामाला परमात्मा म्हणतात. राम-राम म्हणत मग शेवटी शिवाला नमस्कार करतात. तेच परमात्मा आहेत. परमात्म्याच्या नावाचा जप मोजून ठरलेल्या संख्येमध्ये करतात. तुम्हाला तर मोजत बसण्याची आवश्यकता नाही. हे लक्ष्मी-नारायण पवित्र होते ना. यांचीच दुनिया होती, जी भूतकाळात होऊन गेली आहे. त्याला स्वर्ग, नवीन दुनिया म्हटले जाते. मग घर जसे जुने होते तेव्हा मोडकळीस येते. ही दुनिया देखील अशीच आहे. आता आहे कलियुगाचा शेवट. किती सोप्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. धारण करायच्या आहेत आणि करून घ्यायच्या आहेत. सर्वांना समजावून सांगण्यासाठी बाबा तर जाणार नाहीत. तुम्ही मुले ईश्वरीय सेवेवर आहात. बाबा जी सेवा शिकवतात, तीच सेवा करायची आहे. तुमची फक्त ईश्वरीय सेवा आहे. तुमचे नाव मोठे करण्यासाठी बाबांनी तुम्हा मातांना कलश दिला आहे. असे नाही की पुरुषांना मिळत नाही. मिळतो तर सर्वांनाच. आता तुम्ही मुले जाणता आपण किती सुखी स्वर्गवासी होतो, तिथे कोणीही दुःखी नव्हते. आता आहे संगमयुग तर आता आपण त्या नवीन दुनियेचे मालक बनत आहोत. आता आहे कलियुग जुनी पतित दुनिया. मनुष्य तर एकदम जसे म्हैस-बुद्धी आहेत. आता तर या सर्व गोष्टींना विसरावे लागते. देहा सहित देहाचे सर्व संबंध सोडून स्वतःला आत्मा समजायचे आहे. शरीरामध्ये आत्मा नसेल तर शरीर काहीच करू शकत नाही. या शरीरामध्ये किती मोह ठेवतात, शरीर जळून गेले, आत्म्याने जाऊन दुसरे शरीर घेतले तरी देखील १२ महिने नुसते, ‘अरे देवा’, म्हणत आक्रोश माजवतात. आता तुमची आत्मा शरीर सोडेल तर जरूर नंबरवार उच्च घरामध्ये जन्म घेईल. थोडे ज्ञान धारण करणारा साधारण कुळामध्ये जन्म घेईल, जास्त ज्ञान धारण करणारा उच्च कुळामध्ये जन्म घेईल. तिथे (सतयुगामध्ये) सुख देखील अथाह असते. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- १) बाबा जे ऐकवतात ते ऐकून न ऐकल्यासारखे करायचे नाही. गुणवान बनून सर्वांना सुख द्यायचे आहे. पुरुषार्थ करून सर्वांचे दुःख दूर करायचे आहे.
- २) विकारांच्या अधीन होऊन कोणतेही विकर्म करायचे नाही. सहनशील बनायचे आहे. कोणतीही क्रिमिनल (अशुद्ध-विकारी) इच्छा ठेवायची नाही.
| वरदान:- |
शांतीच्या शक्तीद्वारे असंभवला संभव करणारे सहजयोगी भव शांतीची शक्ती सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. शांतीच्या शक्तिमधूनच बाकी सर्व शक्तींचा उगम झाला आहे. विज्ञानाच्या शक्तीचा सुद्धा जो प्रभाव आहे ते विज्ञान देखील शांतीच्या शक्ती द्वारे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे शांतीच्या शक्तीद्वारे जे पाहिजे ते करू शकता. असंभवला देखील संभव करू शकता. ज्या गोष्टीला दुनियावाले असंभव म्हणतात ते तुमच्यासाठी संभव आहे आणि संभव असल्याकारणाने सोपे आहे. शांतीच्या शक्तीला धारण करून सहजयोगी बना. |
| बोधवाक्य:- | वाणीद्वारे सर्वांना सुख आणि शांती द्या तर तुम्ही गायन योग्य बनाल. |