| 26.10.2024 |
प्रभात:मुरली
ओम शांती
बापदादा
|
मधुबन |
| “गोड मुलांनो - सर्वशक्तीमान बाबा आले आहेत तुम्हाला शक्ती देण्याकरिता, जितके आठवणीमध्ये रहाल तेवढी शक्ती मिळत राहील” | |
| प्रश्न:- | या ड्रामामध्ये सर्वांपेक्षा चांगल्यात चांगला पार्ट तुम्हा मुलांचा आहे - तो कसा? |
| उत्तर:- | तुम्ही मुलेच बेहदच्या बाबांचे बनता. भगवान, टीचर बनून तुम्हाला शिकवत आहेत, तर भाग्यशाली झालात ना! विश्वाचे मालक तुमचे पाहुणे बनून आले आहेत, ते तुमच्या मदतीने विश्वाचे कल्याण करतात. तुम्ही मुलांनी बोलावले आणि बाबा आले, हीच आहे दोन हातांची टाळी. आता बाबांकडून तुम्हा मुलांना पूर्ण विश्वावर राज्य करण्याची शक्ती मिळते. |
ओम् शांती. गोड-गोड रूहानी मुले बाबांच्या सन्मुख बसली आहेत. टीचरच्या देखील समोर बसले आहेत; आणि हे देखील जाणता की, हे बाबा गुरूच्या रूपामध्ये आले आहेत आम्हा मुलांना घेऊन जाण्याकरिता. बाबा देखील म्हणतात - ‘माझ्या रूहानी मुलांनो, मी तुम्हाला इथून घेऊन जाण्याकरिता आलो आहे’. ही दुनिया जुनी झाली आहे आणि हे देखील जाणता की ही दुनिया घाणेरडी आहे. तुम्ही मुले देखील घाणेरडे बनले आहात. स्वतःच स्वतःला म्हणता, ‘पतित-पावन बाबा येऊन आम्हा पतितांना या दुःखधाम मधून शांतीधामला घेऊन जा’. आता तुम्ही इथे बसले आहात तर मनामध्ये हे आले पाहिजे. बाबा देखील म्हणतात - ‘मी तुमच्या बोलावण्यामुळे, तुमच्या निमंत्रणावरून आलो आहे’. बाबा आठवण करून देतात - खरोखर तुम्ही बोलावत होता ना की या म्हणून. आता तुम्हाला स्मृती आली आहे की आम्हीच बोलवले आहे. आता बाबा कल्पा पूर्वीप्रमाणे ड्रामा अनुसार आलेले आहेत. ते (दुनियेतील) लोक प्लॅन बनवतात ना. हा देखील शिवबाबांचा प्लॅन आहे. यावेळी सर्वांचे आपले-आपले प्लॅन आहेत ना. ५ वर्षाचा प्लॅन बनवतात, त्यामध्ये आपण हे-हे करू, गोष्टी बघा कशा येऊन जुळतात. पूर्वी हे प्लॅन वगैरे बनवत नव्हते. आता प्लॅन बनवत राहतात. तुम्ही मुले जाणता आमच्या बाबांचा प्लॅन हा आहे. ड्रामा प्लॅन अनुसार ५ हजार वर्षांपूर्वी मी हा प्लॅन बनवला होता. तुम्ही गोड-गोड मुले जी इथे खूप दुःखी झाला आहात, वेश्यालयामध्ये पडून आहात, आता मी आलो आहे तुम्हाला शिवालयामध्ये घेऊन जाण्याकरिता. ते शांतीधाम आहे निराकारी शिवालय आणि सुखधाम आहे साकारी शिवालय. तर या वेळी बाबा तुम्हा मुलांना रिफ्रेश करत आहेत. तुम्ही बाबांच्या सन्मुख बसले आहात ना. बुद्धीमध्ये निश्चय तर आहे की बाबा आलेले आहेत. ‘बाबा’ शब्द खूप गोड आहे. हे देखील जाणता आपण आत्मे त्या बाबांची संतान आहोत मग पार्ट बजावण्यासाठी या बाबांचे बनतो. तुम्हाला लौकिक पिता किती वेळा मिळाले आहेत? सतयुगापासून सुख आणि दुःखाचा पार्ट बजावला आहे. तुम्ही जाणता की, आता आपला दुःखाचा पार्ट पूर्ण होत आहे, सुखाचा पार्ट देखील पूर्ण २१ जन्म बजावला आहे. आणि मग दुःखाचा पार्ट अर्धा कल्प बजावला आहे. बाबांनी तुम्हाला आठवण करून दिली आहे, बाबा विचारत आहेत - ‘अगदी असेच आहे ना? आता पुन्हा तुम्हाला अर्धा कल्प सुखाचा पार्ट बजावायचा आहे’. या ज्ञानाद्वारे तुमची आत्मा भरपूर होते आणि नंतर मग रिकामी होते. तर मग पुन्हा बाबा भरपूर करतात, तुमच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घातलेली आहे. गळ्यामध्ये ज्ञानाची माळा आहे. खरोखर आपण हे चक्र फिरतच राहतो; सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग नंतर येतो या स्वीट संगमावर. याला ‘स्वीट’ म्हणणार. शांतीधाम काही स्वीट नाहीये. सर्वात स्वीट आहे पुरुषोत्तम कल्याणकारी संगमयुग. ड्रामामध्ये तुमचा देखील चांगल्यात चांगला पार्ट आहे. तुम्ही किती भाग्यशाली आहात. तुम्ही बेहदच्या बाबांचे बनता. ते येऊन तुम्हा मुलांना शिकवतात. हे किती श्रेष्ठ, किती सोपे शिक्षण आहे. तुम्ही किती श्रीमंत बनता, यामध्ये कसलीही मेहनत करावी लागत नाही. डॉक्टर, इंजिनियर वगैरे किती मेहनत करतात, तुम्हाला तर वारसा मिळतो, वडिलांच्या कमाईवर मुलाचा हक्क असतो ना. तुम्ही हे शिकून २१ जन्मांची सच्ची कमाई करता. तिथे तुम्हाला असे कोणतेही नुकसान होत नाही, ज्यामुळे बाबांची आठवण करावी लागेल, यालाच अजपाजप म्हटले जाते.
तुम्ही जाणता बाबा आलेले आहेत. बाबा देखील म्हणतात - ‘मी आलो आहे’. दोन्ही हाताची टाळी वाजेल ना. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर जन्म-जन्मांतरीची पापे भस्म होतील. ५ विकार रूपी रावणाने तुम्हाला पाप-आत्मा बनवले आहे पुन्हा पुण्य-आत्मासुद्धा बनायचे आहे’. हे लक्षात आले पाहिजे की, आम्ही बाबांच्या आठवणीने पवित्र बनून मग बाबांसोबत घरी जाऊ. मग या शिक्षणाद्वारे आम्हाला माइट (ताकद) मिळते. देवी-देवता धर्मासाठी म्हटले जाते - रिलिजन इज माइट (धर्म एक शक्ती आहे). बाबा तर आहेत सर्वशक्तीमान. तर बाबांकडून आम्हाला विश्वामध्ये शांती स्थापन करण्याची ताकद मिळते. ती बादशाही आमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही इतकी ताकद मिळते. राजांच्या हाती बघा किती ताकद येते. त्यांना किती घाबरतात. एका राजाची किती प्रजा, लष्कर इत्यादी असते परंतु ती आहे अल्पकाळासाठी ताकद. ही तर आहे २१ जन्मांसाठी ताकद. आता तुम्ही जाणता - आपल्याला सर्वशक्तीमान बाबांकडून विश्वावर राज्य करण्याची ताकद मिळते. प्रेम तर असते ना. देवता आत्ता प्रत्यक्षात नसताना देखील त्यांच्यावर किती प्रेम आहे. जेव्हा समक्ष असतील तेव्हा प्रजेचे किती प्रेम असेल. आठवणीच्या यात्रेद्वारे ही सर्व ताकद तुम्ही घेत आहात. या गोष्टी विसरू नका. आठवण करता-करता तुम्ही खूप शक्तिशाली बनता. सर्वशक्तिमान दुसऱ्या कोणालाही म्हटले जात नाही. सर्वांना शक्ती मिळते, या वेळी कोणातही शक्ती नाहीये, सर्व तमोप्रधान आहेत. तर सर्व आत्म्यांना एकाकडूनच शक्ती मिळते, आणि मग आपल्या राज्यामध्ये येऊन आपापला पार्ट बजावतात. आपला हिशोब चुकता करून मग असेच नंबरवार शक्तीमान बनतात. पहिल्या नंबरची शक्ती आहे या देवतांमध्ये. हे लक्ष्मी-नारायण खरोखर साऱ्या विश्वाचे मालक होते ना. तुमच्या बुद्धीमध्ये सृष्टीचे संपूर्ण चक्र आहे. जसे तुमच्या आत्म्यामध्ये हे नॉलेज आहे, तसे बाबांच्या आत्म्यामध्ये देखील सर्व नॉलेज आहे. आता तुम्हाला ज्ञान देत आहेत. ड्रामामध्ये पार्ट भरलेला आहे, जो रिपीट होत राहतो. पुन्हा तोच पार्ट ५ हजार वर्षानंतर रिपीट होईल; हे देखील तुम्ही मुले जाणता. तुम्ही सतयुगामध्ये राज्य करता तेव्हा बाबा रिटायर आयुष्य जगतात; मग पुन्हा स्टेजवर कधी येतात? जेव्हा तुम्ही दुःखी होता. तुम्ही जाणता त्यांच्यामध्ये संपूर्ण रेकॉर्ड भरलेले आहे. किती छोटी आत्मा आहे, तिच्यामध्ये किती समज (बुद्धी) असते. बाबा येऊन किती समज देतात. मग तिथे सतयुगामध्ये हे सर्व विसरून जाता. सतयुगामध्ये तुम्हाला हे नॉलेज असत नाही. तिथे तुम्ही सुख उपभोगत राहता. हे देखील तुम्हाला आता समजते, सतयुगामध्ये आम्हीच देवता बनून सुख उपभोगतो. आता आपण सो ब्राह्मण आहोत, पुन्हा सो देवता बनत आहोत. हे ज्ञान चांगल्या प्रकारे बुद्धीमध्ये धारण करायचे आहे. कोणाला समजावून सांगितल्यामुळे आनंद होतो ना. तुम्ही जणू प्राणदान देता. म्हणतात ना, काळ येऊन सर्वांना घेऊन जातो. काळ वगैरे कोणी नाही आहे. हा तर पूर्व नियोजित ड्रामा आहे. आत्मा म्हणते मी एक शरीर सोडून निघून जाते आणि मग दुसरे घेते. मला कोणी काळ खात नाही. आत्म्याला जाणीव होते. आत्मा जेव्हा गर्भामध्ये असते तेव्हा साक्षात्कार होऊन दुःख भोगते. आतमध्ये शिक्षा भोगते म्हणून त्याला म्हटले जाते गर्भ-जेल. हा किती अद्भुत ड्रामा बनलेला आहे. गर्भ-जेलमध्ये शिक्षा भोगत स्वतःचा साक्षात्कार करत असतात. शिक्षा का मिळाली? साक्षात्कार तर घडवतील ना की, ही-ही चुकीची कामे केली आहेत, यांना दुःख दिले आहे. तिथे सर्व साक्षात्कार होतात तरी देखील बाहेर आल्यानंतर पाप-आत्मा बनतात. सर्व पापे भस्म कशी होणार? ते तर मुलांना समजावून सांगितले आहे - या आठवणीच्या यात्रेमुळे आणि स्वदर्शन चक्र फिरविल्यामुळे तुमची पापे भस्म होतात. बाबा म्हणतात सुद्धा - ‘गोड-गोड स्वदर्शनचक्रधारी मुलांनो, तुम्ही ८४ चे हे चक्र फिरवाल तर तुमची जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट होतील’. चक्राची सुद्धा आठवण करायची आहे, ज्यांनी हे ज्ञान दिले, त्यांची सुद्धा आठवण करायची आहे. बाबा आम्हाला स्वदर्शन चक्रधारी बनवत आहेत. बनवतात तर खरे परंतु मग दररोज नवीन-नवीन येतात तर त्यांना रिफ्रेश करायचे असते. तुम्हाला सर्व ज्ञान मिळाले आहे, आता तुम्ही जाणता आपण इथे आलो आहोत पार्ट बजावण्याकरिता. ८४ चे चक्र पूर्ण केले आहे आता परत जायचे आहे. तुम्ही असे चक्र फिरवत राहता का? बाबा जाणतात मुले खूप विसरून जातात. चक्र फिरवण्यामध्ये तर काहीच त्रास नाही, फुरसत तर खूप मिळते. शेवटी तुमची ही स्वदर्शन चक्रधारीची अवस्था राहील. तुम्हाला असे बनायचे आहे. संन्यासी लोक तर हे शिक्षण देऊ शकणार नाहीत. स्वदर्शन चक्राला खुद्द गुरू लोक सुद्धा जाणत नाहीत. ते तर फक्त म्हणतील - चला गंगेच्या तीरावर. किती लोक आंघोळ करतात! पुष्कळ लोकं आंघोळ करतात त्यामुळे गुरूंची कमाई होते. पुन्हा-पुन्हा यात्रेला जातात. आता त्या यात्रेमध्ये आणि या यात्रेमध्ये बघा किती फरक आहे. ही यात्रा त्या सर्व यात्रांमधून मुक्त करते. ही यात्रा किती सोपी आहे. चक्र सुद्धा फिरवा. एक गाणे देखील आहे ना - ‘चारों तरफ लगाये फेरे फिर भी हरदम दूर रहे’. बेहदच्या बाबांपासून दूर राहिलो. याची तुम्हाला जाणीव आता होते आहे. ते लोक या अर्थाला जाणत नाहीत. आता तुम्ही जाणता खूप फेऱ्या मारत राहिलो. आता या फेऱ्यांमधून तुम्ही मुक्त झाले आहात. फेरे मारून काही जवळ आला नाहीत, अजूनच दूर होत गेलात.
आता ड्रामा प्लॅन अनुसार सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी बाबांनाच यावे लागते. बाबा म्हणतात - ‘माझ्या मतानुसार तुम्हाला चालायचेच आहे, पवित्र बनायचे आहे. या दुनियेला दिसत असूनही बघायचे नाही’. जोपर्यंत नवीन घर बनून तयार होत नाही तोपर्यंत जुन्या घरातच रहावे लागते. बाबा संगमावरच वारसा देण्यासाठी येतात. बेहदच्या बाबांचा बेहदचा वारसा आहे. मुले जाणतात बाबांचा वारसा आमचा आहे. त्या आनंदामध्ये राहतात. आपली कमाई सुद्धा करतात आणि बाबांचा वारसा सुद्धा मिळतो. तुम्हाला तर वारसाच मिळतो. तिथे तुम्हाला कळणारही नाही की आपल्याला स्वर्गाचा वारसा कसा मिळाला. तिथे तर तुमचे आयुष्य खूप सुखी असते कारण तुम्ही बाबांची आठवण करून शक्ती घेता. पाप नष्ट करणारे पतित-पावन एक बाबाच आहेत. बाबांची आठवण केल्याने आणि स्वदर्शन चक्र फिरविल्यामुळेच तुमची पापे नष्ट होतात. हे नीट लक्षात घ्या. एवढेच समजावून सांगणे पुरेसे आहे. पुढे जाऊन तुम्हाला जास्त बोलावे लागणार नाही. एक इशारा सुद्धा पुरेसा आहे. बेहदच्या बाबांची आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील. तुम्ही नरा पासून नारायण, नारी पासून लक्ष्मी बनण्यासाठी आला आहात. हे तर लक्षात आहे ना. इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये ही गोष्ट येत नाही. इथे तुम्ही येता, लक्षात आहे आम्ही बापदादांकडे त्यांच्याकडून नवीन दुनियेचा वारसा घेण्यासाठी जातो.
बाबा म्हणतात - ‘स्वदर्शन चक्रधारी बनल्याने तुमची विकर्म विनाश होतील. आता जे तुमचे जीवन हिऱ्यासारखे बनवत आहेत त्याला बघा’. हे देखील तुम्ही समजता - यामध्ये बघण्याची काही गोष्ट नाहीये. हे तुम्ही दिव्य दृष्टीद्वारे जाणता. आत्माच या शरीराद्वारे शिकते - हे ज्ञान आत्ता मिळाले आहे. आपण जी कर्म करतो, आत्माच शरीर घेऊन कर्म करते. बाबांना तुम्हाला शिकवायचे देखील आहे, त्यांचे नाव तर कायम ‘शिव’ हेच आहे. शरीराची नावे बदलतात. हे शरीर तर माझे नाही. ही यांची (ब्रह्माबाबांची) मालमत्ता आहे. शरीर आत्म्याची मालमत्ता असते, ज्याद्वारे पार्ट बजावते. ही तर एकदम सहज-सोपी गोष्ट आहे. आत्मा तर सर्वांमध्ये आहे, सर्वांच्या शरीराचे नाव वेगवेगळे असते. हे तर आहेत परम आत्मा, सुप्रीम आत्मा. सर्वोच्च आहेत. आता तुम्हाला समजते आहे - भगवान तर एक क्रिएटर (रचनाकार) आहेत, बाकी सर्व पार्ट बजावणारी रचना आहे. तुम्हाला हे देखील माहित झाले आहे की आत्मे कसे येतात, सर्वप्रथम आदि सनातन देवी-देवता धर्माचे फार थोडे आत्मे असतात. शेवटी मग पहिले येण्यासाठी लायक बनतात. ही जणू सृष्टी चक्राची माळा आहे जी फिरत राहते. तुम्ही माळा जेव्हा जपता तेव्हा माळेतल्या सर्व मण्यांचे चक्र फिरते ना. सतयुगामध्ये जरासुद्धा भक्ती असत नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे - ‘हे आत्म्यांनो, मामेकम् (मज एकाची) आठवण करा.’ तुम्हाला घरी नक्की परत जायचे आहे, विनाश समोर येऊन उभा ठाकला आहे. आठवणीनेच पापे नष्ट होतील आणि मग शिक्षा भोगण्यापासून देखील सुटका होईल. पद देखील चांगले मिळेल, नाहीतर खूप शिक्षा भोगावी लागेल. मी तुम्हा मुलांकडे किती चांगला पाहुणा आहे. मी सर्व विश्वाला बदलून टाकतो, जुन्या विश्वाला नवीन बनवतो. तुम्ही देखील जाणता - बाबा कल्प-कल्प येऊन विश्वाला बदलून जुन्या विश्वाला नवीन बनवतात. हे विश्व नव्याचे जुने आणि जुन्याचे नवीन होते ना. तुम्ही या वेळी चक्र फिरवत राहता. बाबांच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे, वर्णन करतात, तुमच्या बुद्धीमध्ये देखील आहे की हे चक्र कसे फिरते. तुम्ही जाणता बाबा आलेले आहेत, त्यांच्या श्रीमतावर आम्ही पावन बनतो. आठवणीनेच पावन बनत जाल, मग उच्च पद प्राप्त कराल. पुरुषार्थ देखील करून घेणे आवश्यक आहे. पुरुषार्थ करून घेण्यासाठी किती चित्र इत्यादी बनवतात. जे येतात त्यांना तुम्ही ८४ च्या चक्रावर समजावून सांगता. बाबांची आठवण केल्याने तुम्ही पतिता पासून पावन बनाल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- १) ज्ञानाला व्यवस्थित बुद्धीमध्ये धारण करून अनेक आत्म्यांना प्राणदान द्यायचे आहे, स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे.
- २) या गोड संगमावर आपल्या कमाई सोबतच बाबांच्या श्रीमतानुसार चालून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. आपले आयुष्य कायमचे सुखी बनवायचे आहे.
| वरदान:- |
सर्व वरदानांना वेळेवर कार्यामध्ये उपयोगात आणून फलदायी बनविणारे फल स्वरूप भव बापदादांकडून वेळोवेळी जी काही वरदाने मिळाली आहेत, त्यांना वेळेवर कार्यामध्ये वापरा. वरदान ऐकून फक्त खूष होऊ नका की आज फार छान वरदान मिळाले. वरदानाचा कार्यामध्ये उपयोग केल्यामुळे वरदाने कायम रहातात. वरदान तर अविनाशी बाबांची आहेत परंतु त्यांना फलदायी बनवायचे आहे. यासाठी वरदानाला पुन्हा-पुन्हा स्मृतीचे पाणी द्या, वरदानाच्या स्वरूपामध्ये स्थित राहण्याचे ऊन द्या तेव्हा वरदानांचे फल स्वरूप (मूर्त स्वरूप) बनाल. |
| बोधवाक्य:- | विशेषता या प्रभू प्रसाद आहेत, त्यांना सेवेमध्ये वापरा, वाटा आणि वाढवा. |