| 29.12.2024 |
प्रभात:मुरली
ओम शांती
“अव्यक्त बापदादा”
|
या नवीन वर्षामध्ये सर्व खजिने सफल करून सफलतामूर्त बनण्याची विशेषता दाखवा
आज नवयुगाचे रचता, नव जीवन दाता बापदादा नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आले आहेत. तुम्ही देखील सर्व नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आले आहात का नवयुग साजरे करण्यासाठी आले आहात? नवीन वर्ष तर सर्वजण साजरे करतात परंतु तुम्ही सर्व नवजीवन, नवयुग आणि नवीन वर्ष तिन्ही साजरे करत आहात. बापदादा देखील त्रिमूर्ती मुबारक देत आहेत. नवीन वर्षाची एकमेकांना मुबारक देतात आणि त्यासोबत काही ना काही भेट सुद्धा देतात. गिफ्ट देता ना! परंतु बापदादांनी तुम्हा सर्वांना कोणती गिफ्ट दिली आहे? गोल्डन दुनियेची गिफ्ट दिली आहे. सर्वांना गोल्डन दुनियेची गिफ्ट मिळाली आहे ना! ज्या गोल्डन दुनियेमध्ये, नवयुगामध्ये सर्व प्रकारच्या प्राप्ती आहेत. आठवते आहे आपले राज्य? कोणत्याही अप्राप्तीचे नामोनिशाण सुद्धा नाही. अशी गिफ्ट बापदादांशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही. साऱ्या विश्वामध्ये जर कोणी मोठ्यात मोठी भेटवस्तू जरी दिली तरी देखील काय देतील? मोठ्यात मोठा ताज किंवा तख्त देतील. जेव्हा स्थापना झाली होती, (स्थापनावाले पुढे-समोर बसले आहेत) तेव्हा सुरुवातीलाच ब्रह्मा बाबा मुलांना विचारत होते की, जर तुम्हाला आजकालची कोणतीही राणी ताज आणि तख्त देईल तर तुम्ही जाल? लक्षात आहे ना! तर मुले म्हणत होती - या ताज आणि तख्ताचे काय करणार, जर बाबा मिळाले तर त्यासमोर हे काय आहे! तर या गोल्डन वर्ल्डच्या गिफ्ट समोर कोणतीही गिफ्ट मोठी असू शकत नाही. बरीच मुले विचारतात तिथे कोणकोणत्या गोष्टी प्राप्त असणार? तर बापदादा म्हणतात - प्राप्तीची लिस्ट तर लांबलचक आहे परंतु सार रूपामध्ये काय म्हणतील! अप्राप्त अशी कोणती वस्तू नाही, ज्या जीवनामध्ये पाहिजेत त्या सर्व गोष्टी प्राप्त होणार. तर अशा गोल्डन गिफ्टचे अधिकारी आत्मे आहात. अधिकारी आहात ना! डबल विदेशी अधिकारी आहेत? (हात हलवत आहेत) सगळे राजा बनणार? तर इतके तख्त तयार करावे लागतील. बापदादा म्हणत आहेत तो तख्त तर तख्त आहे, सर्व प्राप्ती आहेत परंतु या संगमयुगाचे स्वराज्य काही त्याच्यापेक्षा कमी नाहीये. आता देखील राजा आहात ना! प्रजा आहात का रॉयल फॅमिली आहात? काय आहात? एक बाबाच आहेत जे अभिमानाने म्हणतात की माझा एक-एक मुलगा राजा बच्चा आहे. राजा आहात ना! राजयोगी आहात कि प्रजा योगी आहात? यावेळी सर्व दिलतख्तनशीन, स्वराज्य अधिकारी राजा मुले आहात, इतका रुहानी (आत्मिक) नशा राहतो ना? कारण यावेळच्या स्वराज्यावरूनच भविष्य राज्य प्राप्त होते. हे संगमयुग खूप-खूप-खूप अमूल्य श्रेष्ठ आहे. संगमयुगाला बापदादा आणि सर्व मुले जाणतात, आनंदाने संगमयुगाला कोणते नाव देतात? मौजमजेचे युग. का? इथे संगमा सारखा आनंद साऱ्या कल्पामध्ये नाही. कारण? परमात्म मिलनाचा आनंद साऱ्या कल्पामध्ये आता मिळतो. संगमयुगाचा प्रत्येक दिवस काय आहे? आनंदच आनंद आहे. आनंद आहे ना? आनंद आहे, गोंधळून तर जात नाही ना! प्रत्येक दिवस उत्सव आहे कारण उत्साह आहे. उमंग आहे, उत्साह आहे की आपल्या सर्व भाऊ-बहिणींना परमात्मा पित्याचे बनवूया. सेवेचा उमंग-उत्साह असतो ना! असे करूया, तसे करूया, हे करूया… प्लॅन बनवता ना! कारण जेव्हा कोणतीही मोठी प्राप्ती होते तेव्हा दुसऱ्याला सांगितल्याशिवाय राहू शकत नाहीत. या संगमयुगाची प्राप्ती गोल्डन वर्ल्डमध्ये सुद्धा होईल. आताच्या पुरुषार्थाचे प्रारब्ध भविष्य गोल्डन वर्ल्ड आहे. तर संगमयुग आवडते का सतयुग आवडते? काय चांगले वाटते? संगम छान आहे ना? फक्त मधून-मधून माया येते. कधी थोडे-थोडे गोंधळून जातात. बरीच मुले सहज योगाला अवघड योग बनवतात, तसा नाही आहे परंतु बनवतात. वास्तविक आहे खूप सोपा, कठीण वाटतो का? ज्यांना अवघड वाटतो त्यांनी हात वर करा. नेहमीच नाही, कधी-कधी अवघड वाटतो? कि सोपा आहे? जे अवघड योगी आहेत त्यांनी हात वर करा. मातांनो अवघड योगी आहात कि सहज योगी आहात? कोणी अवघड योगी आहेत? (कोणीही हात वर करत नाहीत) भर सभेमध्ये हात कसा वर करणार!
सर्व मुले अभिमानाने म्हणतात - ‘माझे बाबा’. माझे बाबा आहेत कि दादींचे बाबा आहेत? माझे बाबा आहेत ना! प्रत्येक जण म्हणेल - ‘पहिले माझे’. असे आहे ना? हे सगळे सिंधी लोक बसले आहेत ना! माझे बाबा आहेत कि दादी जानकीचे बाबा आहेत? दादी प्रकाशमणीचे आहेत? कोणाचे आहेत? माझे आहेत? संपूर्ण दिवस काय आठवणीत राहते? ‘माझे’ ना! बाबा म्हणतात - खूप सोपी युक्ती आहे जितक्या वेळा ‘माझे-माझे’ म्हणता, संपूर्ण दिवसामध्ये किती वेळा ‘माझे’ हा शब्द बोलता? जर मोजाल तर खूप वेळा ‘माझे’ हा शब्द बोलता. जेव्हा ‘माझे’ हा शब्द बोलता तर बस, माझे कोण? माझे बाबा. काही अवघड आहे? कधी-कधी विसरून तर जाता? बापदादा काही नवीन शब्द देत नाहीत, जे नेहमी कार्यामध्ये वापरता ‘मी’ आणि ‘माझे’, तर ‘मी कोण’ आणि ‘माझे कोण’! बरीच मुले पुरुषार्थ अवघड का करून ठेवतात? केवळ विचार करतात बिंदू समोर यावा, बिंदू बिंदू बिंदू… आणि बिंदू निसटून जातो. बिंदू तर आहे परंतु कोणता बिंदू? मी कोण आहे, ते आपले स्वमान स्मृतीमध्ये आणा तेव्हा आनंददायी पुरुषार्थ होईल; फक्त ज्योती बिंदू म्हणता ना त्यामुळे अवघड वाटू लागतो. सोपा पुरुषार्थ, आनंदाचा पुरुषार्थ करा.
या नवीन वर्षामध्ये पुरुषार्थ देखील श्रेष्ठ असावा परंतु श्रेष्ठ असण्या सोबत अगोदर सोपा असावा. सोपा देखील असावा आणि श्रेष्ठ देखील असावा असे होऊ शकते? दोन्ही एकत्र होऊ शकते? डबल फॉरेनर्स बोला, होऊ शकते? तर बापदादा बघतील. बापदादा तर चेक करत राहतात ना! तर अवघड योगी कोण-कोण बनतात! सहज योगी याचा अर्थ असा नाही की, निष्काळजीवाला पुरुषार्थ असावा. श्रेष्ठ देखील असावा आणि सोपा देखील असावा. तर पांडव सहज योगी आहात? सहजयोगी जे आहेत त्यांनी हात वर करा. पहा टी.व्ही. मध्ये येत आहे. मुबारक असो. तर या वर्षी कोणासमोर कोणतीही अडचण येणार नाही कारण सहज योगी आहात. निष्काळजी बनू नका.
वेळेनुसार या नवीन वर्षामध्ये सर्वांना विशेष हे लक्ष्य ठेवायचे आहे की, जे कोणते खजिने प्राप्त आहेत - वेळ आहे, संकल्प आहे, गुण आहेत, ज्ञान आहे, शक्ती आहे… सर्वात मोठा खजिना संकल्प आहे - श्रेष्ठ संकल्प, शुध्द संकल्प. या सर्व खजिन्यांना दररोज सफल करायचे आहे. भरपूर वाटा. दात्याची मुले मास्टर दाता बना. भरपूर वाटा. कशासाठी? सफल करणे अर्थात सफलतेला प्राप्त करणे. तर यावर्षीची हिच विशेषता नेहमी कायम ठेवा. सफल करायचे आहे आणि सफलता आहेच आहे. तुम्ही सर्व म्हणता देखील ना की सफलता आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आहे अधिकार? तर सफल करा आणि सफलता प्राप्त करा. कोणतेही कार्य करा, कोणता ना कोणता खजिना सफल करत जा आणि सफलतेचा अनुभव करत चला. विचार करा - सफलतेचा अधिकार तुम्हा ब्राह्मण आत्म्यांशिवाय इतर कोणाचा अधिकार असू शकतो! का? कारण बाबांनी तुम्हाला ‘सफलता भव’चे वरदान दिले आहे. बापदादा नेहमी म्हणतात की, प्रत्येक ब्राह्मण आत्मा सफलतेचा तारा आहे, सफलता स्वरूप आहे. सफलतेचे तारे आहात ना का मेहनत करणारे तारे आहात? बापदादा सर्व मुलांना सफलतेचा तारा, याच स्वरूपामध्ये पाहतात. आठवते का ब्रह्मा बाबांनी सुरुवातीला किती वेळामध्ये सर्व काही सफल केले? शेवट पर्यंत आपला वेळ सफल केला, जरी कर्मातीत देखील बनले तरीही किती पत्रे लिहिली! समय सफल केला ना! शेवटच्या दिवशी सुद्धा मुखाद्वारे महावाक्यांचे उच्चारण केले. शेवटच्या दिवसापर्यंत सर्व काही सफल केले म्हणून सफलतेला प्राप्त झाले. तर फॉलो फादर. वास्तविक संगमयुगाचा एक-एक संकल्प, एक-एक सेकंद सफल करणे म्हणजेच सफलता मूर्त बनणे आहे. सगळे निश्चयाने म्हणतात ना की, ब्रह्मा बाबांवर तर आमचे खूप प्रेम आहे. तर प्रेमाची निशाणी आहे जे बाबांना प्रिय होते ते मुलांना प्रिय असावे. समय, संकल्प आणि सर्व खजिने सफल व्हावेत. व्यर्थ जाऊ नयेत. प्रेमाची निशाणी - फॉलो फादर. ब्रह्मा बाबांनी विशेषता कोणती दाखवली? जो विचार केला ते सेकंदामध्ये केले. केवळ विचार नाही केला, केवळ प्लॅन बनवले नाहीत, तर प्रॅक्टिकलमध्ये करुन दाखवले. तर असे आहे? फॉलो करणारे आहात ना? चांगले आहे.
आज खुपच आले आहेत - नवीन वर्ष साजरे करण्यासाठी. चांगले आहे. जरी हॉल छोटा झाला तरी मन तर मोठे आहे. पाहा मन मोठे आहे तर सामावून घेतले गेले आहे ना? (आज सभेमध्ये १८-१९ हजार भाऊ-बहिणी बसले आहेत) सर्व बाहेर बसलेले देखील ऐकत आहेत ना? बाहेर बसलेले ऐकत आहेत, ते काही दिसणार नाहीत. बापदादांनी ऐकले की फॉरेनमध्ये सर्वात जास्त ऑस्ट्रेलियावाले रात्री १२ वाजता बसतात आणि ४ वाजता अमृतवेला करून उठतात. तर बापदादांनी आज ऑस्ट्रेलियाची आठवण केली. ऐकत आहात. इथे (हॉलमधील) ऑस्ट्रेलियावाल्यांनी हात वर करा. त्रिमूर्ती मुबारक पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला नंतर सर्वांना.
या वर्षीचे लक्ष्य तर सांगितले - सफल करा, सफलता आहेच आहे. हे सर्वांनी पक्के केले? सफल करायचे आहे. व्यर्थ नाही. संगमयुग समर्थ युग आहे, सफलतेचे युग आहे, व्यर्थचे नाही. व्यर्थचे ६३ जन्म आता संपले. आता हे छोटेसे युग सफल करण्याचे युग आहे. जर समय सफल कराल तर भविष्यामध्ये देखील अर्ध्या कल्पातील पूर्ण काळ राज्य अधिकारी बनाल. जर कधी-कधी सफल कराल तर राज्य अधिकारी सुद्धा कधी-कधी बनाल. समय सफल करण्याचे प्रारब्ध हे आहे. श्वास सफल करत असाल तर २१ जन्म स्वस्थ रहाल. चालता-चालता हार्ट फेल होणार नाही. कोणाचे हृदय बंद पडते, कोणाच्या नलिका ब्लॉक होतात, ते होणार नाही.
ज्ञानाच्या खजिन्याला देखील सफल करा तर ज्ञानाचा अर्थ आहे समज (बुद्धिवान), तिथे इतके बुद्धिवान बनाल की कोणत्याही मंत्र्यांची गरज भासणार नाही. आजकाल तर पहा शपथ घेताच सर्वात आधी मंत्रिमंडळ बनवतात. तिथे साथीदार असणार परंतु मंत्री नसणार. रॉयल फॅमिली प्रत्येक दरबारामध्ये बसणारे ताजधारी असणार. रॉयल फॅमिली काही कमी नसणार, भले तख्तावर जरी बसले नसतील तरी देखील मर्तबा (दर्जा) एकसमान असणार; त्यामुळे असा विचार करू नका की, तख्तनशीन खूप थोडे बनणार, परंतु तुम्ही लोक देखील राज दरबारामध्ये राज्य अधिकाऱ्याच्या रूपामध्ये असणार. तुमच्या मस्तकावर देखील ताज असणार आणि तुमचा पूर्ण अधिकार असणार. तर काय बनणार? नंबरवन कि नंबरवार, काय बनणार? नंबरवार बनणार कि नंबरवन बनणार? तर काय करावे लागेल, माहित आहे? हिम्मत दाखवलीत, हे खूप चांगले आहे. परंतु वन नंबर बनण्यासाठी अगोदर विन करावे लागेल. करत आहात ना! करणार, असे म्हणू नका, करत आहोत. बाकीचे सुद्धा ऐकत आहेत. आज ऐकले की, जुन्या सिंध मधील ब्रह्मा बाबांचे मित्र-परिवार भरपूर आले आहेत. हात वर करा. छोटी मुले उठा, परिवाराच्या परिवार आले आहेत. छान. काही कमाल (चमत्कार) करून दाखवाल ना! काय दाखवणार? (मेसेज देऊ) ते तर करतच आहात. अच्छा ३८ आले आहेत, तर काय कमाल करणार? चला जास्त काही म्हणत नाही, छोटीशी गोष्ट सांगत आहे, करण्यासाठी तयार आहात? मुले देखील कमाल करणार ना? (३८ लाख बनवणार) पद्म गुणा मुबारक असो. तुम्ही तर मोठी गोष्ट सांगितलीत परंतु बापदादा छोटीशी गोष्ट सांगत आहेत ती म्हणजे - प्रत्येकाने, एकाला घेऊन या. आणायचे आहे? एकाने, एकाला आणा. छोटी मुले आहेत तर मुलांना आणा. माता आहेत तर भाऊ किंवा बहिणीला आणा, परंतु प्रत्येकाने एकाला आणायचे आहे. हा ग्रुप बघून घ्या, तुम्ही यांना गाईड करा, पुढच्या वर्षी घेऊनच या, डबल ग्रुप घेऊन या. बापदादा हेच इच्छितात की, जिथून सुरुवात झाली, तिथेच प्रत्यक्षता होणार आहे. दया येते ना! ब्रह्मा बाबांचे देशवासी आहात तर देशवासीयांवर प्रेम असते.
तुमच्या जवळ खजिने भरपूर आहेत, गुणांचा खजिना किती मोठा आहे, शक्तींचा खजिना किती मोठा आहे. तर गुण दान, शक्तींचे दान करणारे मास्टर दाता बना. जे कोणी येईल मग ते नातेसंबंधामध्ये येतील, किंवा संपर्कामध्ये येतील परंतु त्यांना कोणत्या ना कोणत्या गुणाची किंवा शक्तीची गिफ्ट द्या. कोणीही रिकाम्या हाताने जाऊ नये. आणखी काही नाही तर निदान बाबांच्या संदेशाचे गोड बोल, ते गोड बोल सुद्धा गिफ्ट म्हणून द्या. दुनियावाले तर कोणताही उत्सव असतो ना तेव्हा एकमेकांचे तोंड गोड करतात. परंतु बापदादा म्हणतात तोंड गोड तर करायचेच आहे परंतु तुमचा गोड चेहेरा देखील दाखवायचा आहे. फक्त तोंड गोड नाही, चेहरा देखील गोड. इतकी मधुरता जमा आहे ना! जी वाटाल तरीही भरपूर रहाल आणि या खजिन्याला जितके वाटाल तितका वाढेल, कमी होणार नाही. तर यावर्षी नोट करा, जी कोणती आत्मा आली तिला मी काही दिले का? जर ऐकणारा नसेल तर गोड शक्तिशाली दृष्टी द्या. परंतु द्यायचे जरूर आहे. रिकामी जाऊ नये. हे तर सोपे आहे ना! का कठीण आहे?
अच्छा - एक सेकंदाची मनाची ड्रिल लक्षात आहे? प्रत्येकजण संपूर्ण दिवसभरामध्ये किती वेळा ही ड्रिल करता? हे नोट करा. ही मनाची ड्रिल जितक्या वेळा कराल तितकेच सहज योगी, सरल योगी बनाल. एका बाजूला मनसा सेवा दुसऱ्या बाजूला मनसा एक्सरसाईज. ‘आता-आता निराकारी, आता-आता फरिश्ता’. ब्रह्मा बाबा तुम्हा फरिश्त्यांचे आवाहन करत आहेत. फरिश्ता बनून ब्रह्मा बाबांसोबत आपल्या घरी निराकार रूपामध्ये जायचे आणि मग देवता बनायचे. अच्छा.
चोहो बाजूने खूप-खूप प्रेमपूर्वक आठवण मग कार्डाच्या रूपामध्ये, किंवा पत्राच्या रूपामध्ये बापदादांपाशी पोहोचली आहे. बापदादा जाणतात की प्रत्येकजण हेच समजतात, ‘माझी आठवण बाबांना द्या’, परंतु मिळाली. प्रेमपूर्वक आठवण देणारी खूप लाडकी मुले बापदादांसमोर आहेत म्हणून बापदादा म्हणतात की प्रत्येक मुलाने आपल्या-आपल्या नावाने मुबारक आणि अंतःकरणापासूनचे आशीर्वाद स्वीकार करा.
तुम्हा सर्वांनाही नव जीवन, नवयुग आणि नवीन वर्षाची खूप-खूप पद्म-पद्म-पद्म-पदमगुणा मुबारक आणि अंतःकरणपूर्वक आशीर्वाद आहेत, प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
बापदादांनी सर्व मुलांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या:-
चोहो बाजूच्या अति गोड, खुप लाडक्या मुलांना पद्म-पद्मगुणा नवीन वर्षाची मुबारक असो. हा जो क्षण निघून गेला, तो आहे निरोप आणि शुभेच्छांचा क्षण. एका बाजूला निरोप द्यायचा आहे, ज्या गोष्टीची संपन्न बनण्यामध्ये स्वतःमध्ये कमतरता अनुभव करता, त्याला निरोप, कायमसाठी निरोप द्या आणि पुढे झेप घेण्यासाठी शुभेच्छा. अभिनंदन असो, अभिनंदन असो, अभिनंदन असो. अच्छा - ओम् शांती.
| वरदान:- |
स्मृतीला अनुभवाच्या स्थितीमध्ये स्थित करणारे नंबरवन विशेष आत्मा भव सर्व ब्राह्मण आत्म्यांमध्ये संकल्प असतो की, आपण विशेष आत्मा नंबरवन बनावे परंतु संकल्प आणि कर्म यामधील अंतराला समाप्त करण्यासाठी स्मृतीला अनुभवामध्ये आणायचे आहे. जसे ऐकलेले, समजलेले लक्षात राहते तसे स्वतःला त्या अनुभवाच्या स्थितीमध्ये आणायचे आहे यासाठी स्वतःच्या आणि वेळेच्या महत्वाला जाणून मन आणि बुद्धीला कोणत्याही अनुभवाच्या सीटवर सेट करा तर नंबरवन विशेष आत्मा बनाल. |
| सुविचार:- | वाईट गोष्टींची स्पर्धा सोडून चांगल्या गोष्टींसाठी स्पर्धा करा. |